नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांना वृद्धत्वामध्ये आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकार नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबवत असते. याच धर्तीवर महाराष्ट्र विधानसभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे नवीन विधेयक मांडण्यात आले आहे. या विधेयकामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि नवीन योजनांचा संपूर्ण तपशील सविस्तरपणे सांगण्यात आला आहे.
आमदार डॉ. राहुल पाटील यांनी प्रभारी सदस्य म्हणून विधानसभेत ‘विधानसभा विधेयक क्रमांक ७२ (वर्ष २०२५-२०२६)’ सादर केले आहे. या विधेयकाचे नाव ‘महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम’ असे आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर नक्की कोणत्या योजना सुरू होणार आहेत, कोणाला लाभ मिळणार आणि वयाची अट काय असेल, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
नवीन विधेयकानुसार ‘ज्येष्ठ नागरिक’ कोणाला मानले जाईल? (Age Limit)
सध्या वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळी आहे. परंतु, या नवीन प्रस्तावित विधेयकानुसार:
- महाराष्ट्रातील अशी कोणतीही व्यक्ती (पुरुष असो अथवा महिला), ज्यांचे वय ६५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना ‘ज्येष्ठ नागरिक’ मानले जाईल.
या विधेयकातील ६ मोठ्या आणि महत्त्वाच्या योजना (Proposed Benefits):
आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मांडलेल्या या विधेयकात ज्येष्ठ नागरिकांसाठी खालील ६ अत्यंत महत्त्वाच्या सोयी-सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे:
- दरमहा ₹६,००0 मानधन: ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला ६,००० रुपये मानधन देण्यात यावे.
- ₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार: ज्येष्ठ नागरिक आजारी पडल्यास त्यांना सर्व शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा (उपचार व औषधे) मिळावी.
- महाराष्ट्र दर्शनासाठी ₹१५,००० अनुदान: ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी (फिरण्यासाठी) दरवर्षी १५,००० रुपये महाराष्ट्र दर्शन अनुदान दिले जावे.
- राहण्याची व जेवणाची मोफत सोय: ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस (मुलगा/मुलगी) नाही किंवा ज्यांचे वारसदार त्यांचा सांभाळ करत नाहीत, अशा वृद्धांची राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्था शासनातर्फे मोफत केली जाईल.
- टोल फ्री हेल्पलाईन नंबर: ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी एक विशेष टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू केला जाईल.
- निधीची तरतूद: या सर्व योजनांवर होणारा खर्च हा थेट राज्याच्या मुख्य निधीतून (State Fund) केला जावा.
हे विधेयक मांडण्यामागचे मुख्य कारण काय? (Aim & Objective)
राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वृद्धांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे, तर काही जण निराधार अवस्थेत जगत आहेत. वृद्धपकाळात औषधोपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात.
सध्या केंद्र सरकारची ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ‘प्रधानमंत्री आयुष्मान वय वंदन योजना’ सुरू आहे. तसेच रेल्वे तिकिटात महिलांना (६० वर्ष) व पुरुषांना (६५ वर्ष) ५०% सवलत मिळते. महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसमध्येही (MSRTC) ५०% ते १००% पर्यंत सवलत दिली जाते. परंतु, वाढती महागाई पाहता या सोयी अपुऱ्या पडत आहेत. म्हणूनच, ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी-सवलती कायदेशीररीत्या मिळवून देणे हा या विधेयनाचा मुख्य उद्देश आहे.
योजना कधीपासून लागू होणार? (GR कधी येणार?)
महत्त्वाची टीप (वाचकांसाठी स्पष्टीकरण): मित्रांनो, हे सध्या केवळ विधानसभेत मांडलेले एक ‘विधेयक’ (Proposed Bill) आहे. म्हणजेच ही शासनाची मागणी आहे. जेव्हा या विधेयकाला विधानसभा आणि विधान परिषदेत पूर्ण बहुमताने मंजुरी मिळेल आणि त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी होईल, तेव्हा त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
त्यानंतर सरकार या योजनांच्या अधिकृत अटी व शर्ती (Rules & Regulations) आणि जीआर (GR) प्रसिद्ध करेल. जीआर आल्यानंतरच या योजना अधिकृतपणे संपूर्ण महाराष्ट्रात लागू होतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
निष्कर्ष: डॉ. राहुल पाटील यांनी मांडलेले हे विधेयक ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी अत्यंत क्रांतिकारी ठरू शकते. या विधेयकाला मंजुरी मिळून जेव्हा शासनाचा अधिकृत जीआर (GR) येईल, तेव्हा त्याची सर्वात आधी माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत आपल्या चॅनल व ब्लॉगवर दिली जाईल.
